एमआयडीसीतील फ्लिपकार्ड कार्यालयातून तीन लाखाचे १८ मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या फ्लिपकार्डच्या ऑफिसमधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल लंपास झाल्याची घटना आज सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये १४७ मध्ये इंन्सटाकार्ड फ्लिपकार्ड कुरीयर सर्व्हीसेसचे ऑफिस आहे. त्याच्या शेजारी एक बंद गाळा असून त्याच्या समाईक भितींला एक दरवाजा असून त्याला आतून ऑफिसवाल्यांनी कडी लावलेली आहे. फ्लिपकार्डच्या ऑफिसमध्ये प्रवीण रमेश डिवरे (वय-३३) हे सहा वर्षांपासून मॅनेजर तर कंपनीचे टिम लीडर म्हणून रणजीतसिंग बिरसिंग पाटील हे काम करतात. या ऑफिसमध्ये बाहेरगावाहून ऑर्डर केलेल्या वस्तू ठेवूनयाठिकाणाहून त्या संबंधितांकडे पोहचविल्या जातात. गुरुवारी १८ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास प्रवीण डिवरे हे काम आटोपून घरी निघून गेले. यावेळी टीम लिडर रणजीतसिंग पाटील व इरशाद शेख हे दोघ होते ते रात्री ९.३० वाजता ऑफिस बंद करुन निघून गेले.

ऑफिसमधून सामान रिकामा करणारा शांताराम वसंत शिंदे हा आज सकाळी ६.१० वाजेच्या सुमारास ऑफिसमध्ये आला. त्यावेळी त्याला ऑफिसमधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला व चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ऑफिसच्या परिसराची टेहाळणी केली. त्यानंतर चोरटा रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सव्वादोन वाजता तो चोरटा चोरलेले साहित्य घेवून बाहेर पडला. ही सर्व घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. चोरट्याने ऑफिसमधून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे २ लाख ९९ हजार ४२४ रुपये किंमतीचे १८ मोबाईल लंपास केले असून उर्वरीत सर्व साहित्य याठिकाणी जसेच्या तसे पडलेले होते. याप्रकरणी आज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content