विरोधी पक्षांचे १७ आमदार भाजपात येण्यास सज्ज – दानवे यांचा दावा

aa Cover auduvv33u11dm9gbic04qeg2c2 20190326040029

जालना, वृत्तसंस्था | ‘राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या आमच्याकडे प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चारजण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,’ असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी आज केला.

 

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो, पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिले आहे’ असे दानवे म्हणाले. ‘विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते, यावरून काय ते समजा,’ असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का असे विचारलं असता, ‘राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात ज्यांची नावे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपवाले राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवणार आणि उद्याच्या मंत्रिमंडळात त्यांनाच घेणार असल्याने भविष्यात राज्यात राष्ट्रवादीचीच सत्ता असेल, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचाही दानवे यांनी समाचार घेतला. ‘विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पूर्वी भाजपमध्ये होते आणि सध्या राष्ट्रवादीच्या यात्रेचे नेतृत्व करणारे अमोल कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते, हे ताईंनी लक्षात घ्यावे,’ असेही दानवे म्हणाले.
‘राज्यातील विधानसभा निवडणूक भाजप-सेना एकत्र लढणार आहे. जागा वाटपाचा फार्म्युला ठरलेला आहे. तिकिटे जाहीर झाली की, सगळ्यांना कळेल, जालना शहरातील महाजनादेश यात्रेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा हे सहभागी होणार आहेत,’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Protected Content