मुंबई, वृत्तसेवा | राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज ही कोरोनाचा वाढता प्रसार पाहता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.