अमळनेर प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्य़ातील सटाणा येथे 16 जुन रोजी एक आदर्श विवाह सोहळा होत आहे. कळवण तालुक्यातील पवार तसेच सटाणा येथील ठाकरे कुटुंबियांच्या वतीने लग्नसमारंभ निमित्ताने एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या पोवाड्यांनी प्रेरित होऊन, त्यांचे शिवचरित्र पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाहाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे अंध, अपंग, अनाथ वृद्ध यांच्यासाठी होत असलेल्या शिवाश्रम व त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी या दांपत्याने लग्नात होणारा खर्च हा देणगी म्हणून देण्यात येणार आहे. या लग्नाची आठवण म्हणून डॉ. तनपुरे महाराजांच्या शिवाश्रम मधील एक अपंग मुलगी दत्तक घेऊन तिचे शिक्षण व लग्नापर्यंत सर्व जबाबदारी पवार कुटुंबायांनी घेण्यात आली आहे. तसेच वृक्षारोपण वाटप कार्यक्रम, रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक कार्यक्रमाचे अयोजन केले आहे. विशेष म्हणजे वधू वर हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील चि. संदीप पवार हे परदेशात नोकरी करत आहेत तर सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील वधू चि.सौ.का. सुवर्णा ठाकरे हिने एम.एस.सी.चे शिक्षण पुर्ण केले आहे. या विवाह सोहळ्यासाठी अपंगांचे कैवारी आ. बच्चु कडू हे-ही उपस्थित राहणार असल्याचे वर्तविले जात आहे. अशा या 16 जुन रोजी सुर्या लॉन्स, ताहाराबाद रोड, सटाणा येथे होत असलेल्या या उच्चशिक्षित जोडप्याच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.