बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण १५१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून आज अर्जांची छाननी होणार आहे.
येथील नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार १७ प्रभागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. यात राज्य सरकारने कालच जाहीर केलेल्या निर्णयानुसार ओबीसींसाठी राखीव असणार्या चार जागांवरील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. यामुळे बोदवड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठीच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दरम्यान, नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ११३ अर्ज दाखल झाले असून एकूण अर्जांची संख्या १५१ वर पोहोचली आहे. कालच विद्यमान नगराध्यक्षा मुमताज बागवान यांचा समावेश होता. त्यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळत्या नगरपंचायतीच्या १७ पैकी १५ नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. कालपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात येणार आहे.
बोदवड नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया ही प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे राबवत आहेत.