मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सहा जणांना शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. रामदेववाडी अपघातात मृत झालेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या महिलेचाही यात समावेश आहे. चव्हाण या आशा स्वयंसेविका असून रामदेववाडी येथे निवडणुकीची सोपविलेली जबाबदारी पूर्ण करून घरी परतत असताना अपघातात त्यांच्यासह चार जण ठार झाले होते.
रावेर तालुका कृषि कार्यालयाचे कृषि सहायक दिगंबर निवृत्ती गाजरे, होमगार्ड संतोष बापुराव च-हाटे, लघु पाटबंधारे विभागाचे वाहनचालक मुरलीधर सोना भालेराव, महानगरपालिकेचे लिपिक संजय भगवान चौधरी, चोपडा पंचायत समितीचे कर्मचारी हिरामण ज्ञानेश्वर महाजन व वच्छलाबाई सरदार चव्हाण आदींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना ही मदत मिळणार आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. ही रक्कम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लागलीच वितरीत करण्यात आली आहे.