गोडसेने जीनावर का गोळ्या झाडल्या नाहीत ? : संजय राऊत

मुंबई – फाळणी स्मृतीदिन साजरा करण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गोडसे सारख्यांनी जीनांना संपवले असते, तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते असे त्यांनी म्टले आहे. त्यांनी रोखठोक सदरातून फाळणीवरून मोदींना टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक कॉलममध्ये म्हटले आहे की, फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात १० लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वतःच मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून.

पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. १४ ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व १४ ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतोय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती? 

फाळणी हा जनतेच्या हृदयातील घावच होता. तो घाव आजही भरलेला नाही. पण स्वातंत्र्यानंतर फाळणीस फक्त गांधी-नेहरू-कॉंग्रेसलाच जबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली. ब्रिटिशांनी जीनांना पाकिस्तान मिळवून दिले. जीनांनी पाकिस्तान मिळविला नाही. वकिली डावपेच लढवून, हिंदूंना शिवीगाळ करून त्यांनी पाकिस्तान मिळविला. पाकिस्तानची निर्मिती होत असताना जीना यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या राक्षसी कत्तली ते थांबवू शकले नाहीत. लक्षावधी हिंदू आणि मुसलमान प्रजा निर्वासित होऊन देशोधडीस लागली. माणसांचे विभाजन झाले. जमिनीचे तुकडे पडले. लष्कर, संपत्ती, पैसे म्हणजे गंगाजळीची वाटणी झाली. पुन्हा इतके होऊनही दोन्ही देशांत एकमेकांमध्ये कधीच शांतता नांदू शकली नाही. फाळणी ही आपत्तीच होती व आज ना उद्या देश अखंड होईल या आशावादावर मोठा वर्ग आजही जगात आहे. काही लोक गांधीहत्या करणाऱया पंडित गोडसेंच्या प्रतिमेची आजही पूजा करतात. त्यांच्या फाशी दिवसाचा सोहळा साजरा करतात. गोडसेंना श्रद्धांजली म्हणून गांधीच्या प्रतिमेवर गोळया झाडून पुनःपुन्हा गांधीहत्येचा आनंद साजरा करतात. फाळणी नको असे सांगणारे, लिहिणारे मूठभर लोक तेव्हाही अगदी याच पद्धतीने वागत व जगत होते. त्या काळात एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱया जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ ७५ वर्षांनंतर आली नसती. गोडसेने निःशस्त्र गांधींना मारले. कारण त्यांच्या दृष्टीने फक्त तेच एकमेव फाळणीचे गुन्हेगार होते. मग जीना कोण होते? बॅ. जीनांनी फक्त एक टाईपरायटर,वकिली कौशल्यावर देशाची फाळणी घडवून पाकिस्तान मिळविला. गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते.

 

आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? त्यावर उपाय एकच. फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम, अंतःकरणाच्या खोल कप्प्यात सदैव ठसठसत आहे. हिंदुस्थान पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावे! असे राऊत यांनी यात नमूद केले आहे.

Protected Content