जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील तेरापंथ युवा परिषदेतर्फे आज शनिवार १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरामध्ये ७ ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. तरुणांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने जिल्हाभरातून १४०२ रक्त संकलन यशस्वीपणे करण्यात आले.
तेरापंथ युवक परिषदेतर्फे देशभरात विविध ठिकाणी शनिवार १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामधून अधिकाअधिक रक्त संकलन होऊन नागरिकांना वेळेवर रक्तपुरवठा मिळावा असा उद्देश संस्थेचा होता. यापूर्वी देखील दहा वर्षांपूर्वी त्यांनी असे भव्य महारक्तदान शिबिर घेऊन महत्त्वाचे योगदान दिले होते.
शहरात अणुव्रत भवन येथे ६८, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट येथे ५४, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ४०, मु. जे. महाविद्यालयातील कला विभाग येथे ७७, बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १३९, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दीक्षांत समारंभ १५५ तसेच एमआयडीसी येथील श्री नॅशनल केम कंपनी या ठिकाणी ४१ असे एकूण ५७४ रक्तसंकलन झाले.
तसेच जिल्ह्यामध्ये एकूण १४०२ रक्त संकलन करण्यात तेरापंथ युवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना यश आले. या ठिकाणी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. काही शिबिरांच्या ठिकाणी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. अनुराधा राऊत यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली.
रक्तदान शिबिरासाठी अध्यक्ष सुदर्शन बैद, चेअरमन सुमित छाजेड, हिम्मत सेठिया, पारस लुनिया, पारस कुचेरिया, अरुण बुचा, रवींद्र छाजेड, प्रदीप कोठारी, हेमंत छाजेड, चिराग सेठिया, पारस सेठिया, रुपेश सुराणा, मोहित सेठिया, पवन समसुखा, दिनेश सेठिया आदींनी परिश्रम घेतले.