उज्जैन । मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विषारी दारूमुळे तब्बल १४ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने याची एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
विषारी दारूमुळे देशातील अनेक भागांमध्ये बळी जात असले तरी हा प्रकार अद्याप थांबण्याचे नाव घेतल्याचे आजच्या घटनेतून दिसून आले आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विषारी दारूमुळे तब्बल १४ जणांचा बळी गेला आहे. काल सायंकाळ पासून तेथे एका पाठोपाठ एक अशा प्रकारे लोक मरू लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त उज्जैन नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशीरा पासूनच छापेमारी करण्यात आली असून आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.