Home क्राईम कत्तलीसाठी जाणाऱ्या १४ बैलांची सुटका; रावेर पोलिसांची कारवाई

कत्तलीसाठी जाणाऱ्या १४ बैलांची सुटका; रावेर पोलिसांची कारवाई


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या अंदाजे ३.७ लाख रुपये किमतीच्या १४ बैलांची पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई तालुक्यातील रसलपूर येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गोवंश कत्तलीसाठी गुप्तपणे नेले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईसाठी मोहीम हाती घेतली.

आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास रसलपुर जवळील आदिवासी आश्रमशाळेच्या परिसरात दोन इसम गोवंश घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता दोघेही संशयित फरार झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी १४ बैल जातीचे गोवंश जप्त केले व त्यांना रावेर येथील द्वारकाधीश गोशाळेत सुरक्षित नेण्यात आले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी हुसेन अब्दुल रहेमान तडवी आणि कादिर अब्दुल रहेमान तडवी (दोघेही राहणार पाल) यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ. सतीश सानप, पो.कॉ. संभाजी बिजागरे, राहुल परदेशी आणि होमगार्ड राहुल कासार यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे गोवंश तस्करीला आळा घालण्यास मदत झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. पोलिसांनी जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या धडाडीच्या कृतीबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound