अकरावीसाठी राज्य मंडळाचे नाविन्यपूर्ण संवादी ‘जीवशास्त्र’

11th book

चोपडा प्रतिनिधी । इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या जीवशास्त्र पाठ्यपुस्तकात चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे प्रा.डॉ. प्रकाश लोहार यांचा संशोधानाच्या अनुभव व उपक्रम नवीन जीवशास्त्राच्या पाठयपुस्तकात परावर्तित होत आहे.

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे तर्फे महाराष्ट्रातील इयत्ता 11वीत प्रवेशित विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचा समाविष्ट असणारे जिवशास्त्राचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. वैद्यकीय व औषधनिर्माण क्षेत्रात प्रवेशासाठी एम्स, नीट, सीईटी तसेच विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे हे दर्जेदार पुस्तक आहे.

मुखपृष्ठावर प्राणी व वनस्पतींच्या वर्गीकरणाचे, त्यातील पेशींचे प्रातिनिधिक स्वरूप व सुक्ष्मदर्शकासह मानवाच्या शरीरावरील मांसपेशींची मांडणी केली आहे व मलपृष्ठावर डीएनए, विषाणू, मशरूम व मानवी मेंदूतिल संवेदनांच्या आशयाची चित्रं समाविष्ट केली आहेत. महाविद्यालयातील स्मार्ट तरुण पिढी मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर करीत असतात म्हणूनच पुस्तकाच्या सुरुवातीला क्विक रिसपोन्स (क्यूआर) कोड दिलेला आहे त्याद्वारे विद्यार्थी प्रत्येक मुद्दयावर आधारित सखोल माहिती इंटरनेटवर वाचून, ऐकून, बघून साठवू शकतात. अशा नाविन्यपूर्ण सुविधेसह पुस्तकात वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र असे दोन भाग न करता या वर्षांपासून शब्दबंबाळपणा कमी करून प्रत्येक मुद्यावर आधारित रंगीत आकृत्यांसह स्पष्टीकरण दिलेले असून प्रयोगांसाठी कृती, देशातील संशोधन संस्था, विशेष उपलब्धीप्राप्त शास्त्रज्ञांची माहीती विद्यार्थ्यांना वाचनीय व आकलनास सोप्यापद्धतीत मांडलेली आहे.

पाठयपुस्तकात जीवसृष्टीचे वर्गीकरण, जीवरसायनिक प्रक्रियेतील घटक, पेशी रचना व विभाजन,प्राणी व वनस्पतींच्या ऊती, झुरळाची बाह्य व अंतर्गत शारिरीक संरचना, प्रकाशसंश्लेषण, श्वसन व ऊर्जा वहन, मानवाचे पोषण, उत्सर्जन,अस्थिप्रकार व रचना तसेच हालचाल अशा एकूण 16 प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा व विश्लेषणवृत्ती वाढावी यासाठी प्रकरणांचा शेवटी प्रश्न विचारण्याची विविध पद्धतींचा वापर केला आहे.

विज्ञान समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांचे मार्गदर्शन, सदस्य म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा येथील प्रा डॉ प्रकाश लोहार यांचा प्रदीर्घ शैक्षणिक व संशोधनाचा अनुभव, अभ्यासगटातील सदस्यांचे परिश्रम व विशेषाधिकारी राजीव पाटोळे यांच्या उपक्रमशीलतेचे अभिसरण नवीन जीवशास्त्राच्या पाठयपुस्तकात परावर्तित होत आहे.

Protected Content