मतदानाची टक्केवारी वाढविण्यास तरुणांनी सहभाग नोंदवावा – डॉ. भोसले

dr. bhosale

चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय व चोपडा पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने मतदार जागृती मोहीम २०१९ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे, तसेच मतदान करण्यासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित करत निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे. असे आवाहन डॉ. भावना भोसले (गटशिक्षणाधिकारी व निवडणूक नोडल अधिकारी) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

डॉ. भोसले पुढे बोलतांना म्हणाल्या की, धर्म, वंश, जात यांचा वापर न करता निर्भीडपणे व मुक्त वातावरणात मतदान करावे. याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांकडून मतदार शपथ ही करुन घेतली. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, राजकारणात तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन विधायक कार्य करावे. तसेच नागरिकांनी जागृत राहून योग्य लोकप्रतिनिधीं निवडण्यासाठी मतदान करावे, व मतदानाच्या दिवशी आपले मूलभूत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.ए.सूर्यवंशी, प्रमुख अतिथी डॉ. भावना भोसले, युवराज पाटील (केंद्रप्रमुख, चोपडा पंचायत समिती) तसेच उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य बी.एस.हळपे, डी.डी.कर्दपवार, भूषण पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी. कर्दपवार यांनी केले व सूत्रसंचालन भूषण पवार यांनी केले तर आभार विशाल पाटील यांनी मानले. यावेळी एम.टी.शिंदे, एम.एल.भुसारे, सुनिता पाटील, एस.बी.पाटील, व्ही.डी.शिंदे, हनुमंत पाटील व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content