चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील घाट रोड भागातील एका घरातून पोलिसांनी तब्बल ११ किलो गांजा जप्त केला आहे. या संदर्भात एक महिला व एक पुरूषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील एका घरात गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी आपले सहकारी आणि महसूल खात्याच्या अधिकार्यांचा समावेश असणार्या पथकाच्या मदतीने संबंधीत घरात छापा टाकला. यात ११ किलो २१४ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा उग्र वास असणारा गांजा जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये गांजासह रोकड मिळू एकंदरीत २ लाख २५ हजार ८५५ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात एक महिलेसह अजय उर्फ राकेश भिकन चौधरी ( दोन्ही राहणार कोळीवाडा, घाटरोड, चाळीसगाव) यांच्या विरोधात एन. डी. पी. एस. ऍक़्ट १८८५ चे कलम ८ (क), २०(ब), २ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार महसूल विकास प्रल्हाद लाडवंजारी, सपोनि/विशाल टकले, स.पो.नि. विष्णु आव्हाड, स.पो.नि. सागर ढिकले, स.पो.नि. सचिन कापडणीस, पोउनि. अमोल पवार, हवालदार अभिमन महादु पाटील, पोना भगवान अजब उमाळे, सुभाष रमेश घोडेस्वार, दिपक प्रभाकर पाटील, विनोद विठ्ठल भोई, कॉन्स्टेबल विनोद तुकाराम खैरनार, निलेश हिरालाल पाटील, सबा शेख, नितीन गंगाराम वाल्हे, महेश अरविंद बागुल तसेच फोटोग्राफर अनिकेत चंद्रशेखर जाधव, वजन मापाडी तुकाराम रघुनाथ पाटील यांचा समावेश असणार्या पथकाने केली आहे. या संदर्भातील पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.