कल्याणमध्ये १०६ वर्षांच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त !

मुंबई- जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

दरम्यान, जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झालेल्या आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘आनंदी’ चेहऱ्याने घरी परतल्या.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५८ लाख ७२ हजार २४१ नमुन्यांपैकी १२ लाख ८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५८ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ४९ हजार २१७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.

Protected Content