पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या न्यायालयाचे अध्यक्षस्थान प्र.अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांनी भूषविले.
या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे, तसेच द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २ कोटी ४ लाख १४ हजार ५८३ रुपयांची वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९२ प्रकरणे निकाली निघून २ कोटी १४ लाख २६ हजार ८९२ रुपयांची वसुली करण्यात आली. एकूण १०५८ प्रकरणांचा निपटारा करत ४ कोटी १८ लाख ४१ हजार ४७५ रुपये वसूल करण्यात आले.
यावेळी दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर कौटुंबिक वादातील २० प्रकरणे सोडवण्यात आली.
पॅनल प्रमुख म्हणून जी. एस. बोरा यांनी काम पाहिले, तर पंच सदस्य म्हणून ललिता पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. या लोक न्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी पाचोरा न्यायालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, बीएसएनएल आणि वीज महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, तसेच पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षकार मोठ्या संख्येने हजर राहून तडजोडीच्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निकाल लावून घेतला.