जळगावातील केळी व्यापाऱ्याची १० लाख २० हजारात फसवणूक; मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका केळी व्यापाऱ्याची १० लाख २० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील संशयितावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, शालिक दौलत सोनवणे (वय-७३, रा. भुसावळ ) हे केळी व्यापारी आहेत. त्यांचे जळगाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर मल्हारा मार्केटमध्ये केला सप्लायर्स नावाचे दुकान आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून केळी व्यवसाय करीत आहे. शेतकऱ्यांकडून माल घेवून इतर शहरात आणि परराज्यात पाठविण्याचे काम करतात. यासाठी केळीचा भाव हा फोनद्वारे विश्वासावर ठरविला जात असतो. असाच एक व्यवहार मुंबईतील कांदीवली येथे राहणारा व्यापारी संतोष रामनरेश गुप्ता रा. अतुल टॉवर हिराणेवाडी, केला मार्केट याच्याशी केला होता. गुप्ता यांच्याशी केळी संदर्भात २० एप्रिल २०१८ पासून ते १५ जुलै २०१९ दरम्यान व्यवहार करत आले आहे.

केळीची मागणी केल्यावर सोनवणे हे ट्रक भरून केळीचा माल पाठवत होते. दरम्यानच्या काळात सुमारे ३७ लाख ८२ हजार ५४२ रूपयांचा माल पाठविण्यात आला. त्यापैकी गुप्ता यांनी २७ लाख ६१ हजार ६०० रूपये सोनवणे यांना पाठविले. उर्वरित रक्कत १० लाख २० हजार ९४२ रूपये बाकी आहे. उर्वरित रक्कमेची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात संतोष रामनरेश गुप्ता याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.

Protected Content