पारोळा प्रतिनिधी | पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी १ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
पारोळा शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची साठवणूक सुविधा, जलकुंभ व जलशुद्धीकरण (फिल्ट्रेशन प्लांट) ची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. या करिता नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची क्षमता वाढविणेबाबत कामासाठी या शासनाकडून निधी उपलब्ध करून देणेबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लेखी मागणी केली होती.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.२७ ऑक्टोबर २०२१ रोजी पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची (जलशुध्दीकरण) क्षमता वाढविणेबाबत कामासाठी विशेष निधीची मागणी केली त्यावर त्यांनी तात्काळ मंजुरी देऊन शासनाच्या नगर विकास विभागामार्फत वैशिट्यपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर केला. व याबाबत शासन निर्णयानुसार संबंधिताना आदेश देण्यात आले.
पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पारोळा शहराला पुरविले जाते. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांनाही शहरातील नागरिकांना ८ ते १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. या नवीन जलकुंभ उभारणी व जलशुद्धीकरणाची क्षमता वाढल्यानंतर शहराला किमान एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होईल. याबाबत कित्येक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाल्याचा शहरवासीयांना आनंद होत आहे. या कामासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणरावजी पाटील यांचे सहकार्य लाभले या बाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.