जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस जिल्ह्यात व्यापक स्वरुप प्राप्त झाले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात आल्याने याचे दृश्य स्वरुप म्हणजे जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 88 हजार 811 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जळगाव व यावल येथील उप वनसंरक्षकांशी चर्चा करुन तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रगतीची माहिती घेतली. त्याचबरोबर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही चर्चा केली. जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा या भागात ही मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येत असल्याचे यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. पी. मोरणकर यांनी सांगितले.
तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेस जिल्ह्यातील नागरीकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळत असून या मोहिमेस विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. नागरीकांबरोबरच शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, संघटना, प्रसार माध्यमे यामुळे अवघ्या अडीच महिन्यात जिल्ह्यात 1 कोटी 11 लाख 88 हजार 811 वृक्षांची लागवड झाली आहे.
या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात वन विभागामार्फत 39 लाख 82 हजार 268, जलसंपदा विभागामार्फत 3 हजार 370, सहकार व पणन विभागामार्फत 61 हजार 771, ग्रामपंचायत विभागामार्फत 36 लाख 98 हजार 150, सार्वजनिक बांधकाम 2 लाख 10 हजार 418, सामाजिक वनीकरण विभागामार्फत 19 लाख 52 हजार 706, कृषि विभाग 3 लाख 78 हजार 729, वस्त्रोद्योग व रेशीम विभाग 3 लाख 37 हजार, तर वन्यजीव 19 हजार 63, महसुल विभागामार्फत 1 हजार 50, जलसंधारण 1 लाख 21 हजार 66, नगरविकास विभागामार्फत 62 हजार 220, जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी 1 हजार 618 वृक्षांची लागवड केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असल्याने गाव पातळीवरही वृक्ष लागवड मोहिमेस व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, शिक्षण विभागास देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्याला यावर्षी 1 कोटी 15 लाख 3 हजार 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागाने वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील 9 हजार 376 ठिकाणांची निवड करुन 1 कोटी 19 लाख 55 हजार 718 वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. याकरीता जिल्ह्यात विविध यंत्रणामार्फत 1 कोटी 15 लाख 32 हजार 229 खड्डे खोदण्यात आले आहे. याठिकाणी 1 कोटी 11 लाख 88 हजार 811 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 604 नागरीकांचा सहभाग लाभला असून जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या 93.59 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर उर्वरित उद्दिष्ट 30 स्पटेंबरपूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उप वनसंरक्षक श्री. पगार व मोराणकर यांनी दिली आहे.