नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ब्रिटनची कंपनी कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. ५ लाख ६२ हजार भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणात सीबीआयने युकेमधील अजून एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही कारवाई सुरू केली आहे.
भारतातील फेसबुक युजर्सची गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याप्रकरणी सीबीआयने कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. फेसबुक-कँब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वीच संसदेत दिली होती.
ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदेशीरपणे भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा गोळा केला आणि हा डेटा कॅब्रिज अॅनालिटिकासोबत शेअर केला, असं उत्तर सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिलं होतं. कँब्रिज अॅनालिटिकाने ग्लोबल सायन्स रिसर्चकडून अवैधपणे खासगी डेटा घेतल्याचा आणि या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोप आहे.
मार्च २०१८ मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कँब्रिज अॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरुन चोरल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर ३ एप्रिल, २०१८ रोजी कंपनीने त्यांच्याकडे भारतीयांचा कोणताही फेसबुक डेटा नसल्याचं सांगितलं होतं. तर, याउलट फेसबुकने भारत सरकारला ५ एप्रिल, २०१८ रोजी सांगितलं होतं की, कँब्रिज अॅनालिटिकाने इंस्टॉल केलेल्या अॅपद्वारे जवळपास ५ लाख ६२ हजार ४५५ भारतीयांचा फेसबुक डेटा हस्तगत केला. आता गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.