नवी दिल्ली, वृत्तसंस्था । संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. पण त्यापूर्वी लोकसभेचे पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी बऱ्याच खासदारांची कोरोना टेस्ट सुरू आहे.
कोरोना संकटामुळे यावेळी संसदेच्या अधिवेशनात सर्व काही बदललेलं दिसेल. मार्गदर्शक सूचनांचे पालन करत संसदेचं अधिवेशन होणार आहे. लोकसभेचं कामकाज दररोज ४ तास चालणार आहे. यावेळी प्रश्नोत्तराचा कालावधीही अर्धा तास करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी दिली जातील.
संकटाच्या काळात संसदेचं अधिवेशन होत असल्याने अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष आहे. काही महिने देश लॉकडाउन होता. यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा थांबला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. जीएसटी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यासह राहुल गांधी यांनी भारत-चीनमधील सीमावादावर प्रश्नांची सरबत्ती करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहेत.
दुसरीकडे संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या रुटीन चेक अपसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या. त्यांच्यासोबत राहुल गांधीही आहेत. दोन आठवड्यांसाठी ते अमेरिकेला गेले आहेत. सोनिया गांधी यांच्या अनुपस्थित काँग्रेस आणि विरोधी पक्ष कशाप्रकारे सरकारला संसदेत घेरणार याकडे आता लक्ष असेल.