४ वर्षात दुप्पट रकमेच्या आमिषाने ३३ लाख अन गुंतवणूकदारांचा जीवही गेला ! ; ऑनलाइन फसवणुकीचा जहरी विळखा !!

 

 

जळगाव प्रतिनिधी । चार वर्षात पैसे दुप्पट देण्याचे आमीष देत इन्शुरन्स कंपनीच्या भामट्यांनी निवृत्त कृषी सहायकास ३३ लाख २० हजार ७५२ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. त्यांनी  निवृत्तीनंतर मिळालेले पैसे ऑनलाइन पद्धतीने पाठवले. परंतु, फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा  धास्तीने मृत्यूही झाला.

 

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवरे (रा. खोटेनगर) यांची फसवणूक झाली आहे.

 

देवरे यांचे ८ मार्चरोजी निधन झाले  देवरे हे ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात सहायक पदावर नोकरीस होते. सन २०१४ मध्ये देवरे यांना गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) या तरुणांनी मोबाईलवर फोन करण्यास सुरूवात केली. आपण ‘लाइफ प्लस इन्शुरन्स’ या कंपनीतून बोलत असल्याचे त्यांनी देवरे यांना सांगीतले. या कंपनीच्या पॉलिसीत पैसे गुंतवल्यास चार वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे आमीष त्यांनी देवरेंना दिले. या आमीषांना बळी पडलेल्या देवरे यांनी सुरूवातीला दोन लाख रुपये गुंतवले .  त्यानंतर  भामट्यांनी काही बनावट कागदपत्र पाठवुन त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळी फि, खर्च या माध्यमातून भामट्यांनी वेळोवेळी पैशांची मागणी सुरूच ठेवली. भरलेली रक्कम चार वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वास त्यांनी देवरेंना  दिला होता.

 

भामट्यांच्या या आमीषांना बळी पडून देवरे यांनी फेब्रुवारी २०२१ पर्यंत  म्हणजेच सुमारे सहा वर्षात भामट्यांना ऑनलाइन  माध्यमातून ३३ लाख २० हजार ७५२ रुपये पाठवले होते. दरम्यान, सन २०१३ मध्ये देवरे सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना शासनाकडून मिळालेले पैसे त्यांनी भामट्यांना पाठवुन दिले. पैसे भरल्यानंतर परत कधी मिळणार याची विचारणा त्यांनी वेळोवेळी केली होती. परंतु, भामट्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेली. फेब्रुवारी २०२१ मध्ये भामट्यांनी देवरे यांचा फोन घेणे देखील बंद केले होते. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवरे हे धास्तीत गेले. पैशांच्या चिंतेत असताना ८ मार्च २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.

 

यानंतर कुटंुबीयांनी देवरे यांच्या काही पॉलिसींची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वेळोवेळी करुन ३३ लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यात आल्याचे समोर आले. देवरे यांनी तीन लाख रुपये गंुतवल्याची माहिती कुटंुबीयांना दिली होती. परंतु, यानंतर त्यांनी पुढील पैसे गुंतवताना कुणालाही काही सांगीतले नाही. परिणामी कुटंुबीयांना देखील धक्का बसला. देवरे यांचा मुलगा सुनिल यांनी या संदर्भात संपुर्ण माहिती गोळा केली असता वडीलांना कुणीतरी फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुनील देवरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content