चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा देण्यात येत नसून ४२ रुग्णांसाठी केवळ २ कर्मचारी तैनात करण्यात असून रूग्णावर उपचार होत नसल्याचा धक्कादायक प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
याबात आ. मंगेश चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की , या सेंटरमध्ये उपचार होत नसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याबाबत संबधित रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला होता. यानंतर रात्री १२. ३० वाजता सेंटरला भेट दिली असता विदारक चित्र पहावयास मिळाले. येथे ४२ रुग्ण उपचार घेत असतांना केवळ दोन कर्मचारी हजर होते. या सेंटरमधील एक रुग्ण अत्यावस्थ असतांना येथील यंत्रणा त्यांची पाहिजेतशी देखभाल करण्यात कमी पडत आहे. त्या रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी आलो असता ती मागील ५ दिवसांपासून पंक्चर अवस्थेत उभी आहे. शासनाने ही रुग्णवाहिका भाडेकरार तत्वावर घेतली आहे. मात्र, या रुग्णवाहिके ऐवजी छोट्या गाडीतून अत्यवस्थ रुग्णाला जळगाव येथे हलविण्यात येत होते. हा प्रकार रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा आहे. येथील यंत्रणेला वारंवार सूचना देत आलो आहे. राज्य शासनाने एवढे मोठे कोविड सेंटर उभे केले आहे. या सेंटरमध्ये लोकांच्या दातृत्वातून ५० ते ६० लाखांचे विविध उपकरण आणली आहेत. त्या वस्तूंची सोडाच परंतु येथील रुग्णाची देखील व्यवस्थित काळजी घेतली जात नसून या रुग्णांन मरणाच्या खाईत लोटण्याचा प्रकार घडत असतो. राज्य सरकार सतत मोठ्या गोष्टी करत असते मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे केवळ दोन कर्मचाऱ्यांवर मोठे सेंटर चालू आहे. याबाबत मी सर्व नोंदी घेतल्या आहेत. हा जीवघेणा प्रकार असून मी तत्काळ उद्या आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासाबोत बोलणार आहे. मात्र, दुर्दैवाने त्या अत्यवस्थ रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर येथील सेंटरचे प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, जळगावची घटना ताजी असतांना दुसरी घटना घडण्याची वाट पाहू नका कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे ती वाढविण्यात यावी. चुकीच्या पद्धतीने बिले काढली असतील तर याची देखील चौकशी करून संबंधितान कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ. मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/273058614392405