नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलनात प्रमुख चेहरा बनलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत बाबत मोठं वक्तव्यं केलं आहे. ३ क्विंटल गव्हाची किंमत १ तोळा सोन्याएवढी करा असे राकेश टिकैत म्हणाले
दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. एका मुलाखतीत राकेश टिकैत यांनी गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीला जोडली. ज्या प्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे, त्यानुसार गव्हाची किंमत वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलंय. ३ क्विंटल गव्हाची किंमत १ तोळा सोन्याएवढी हवी, असं वक्तव्य टिकैत यांनी केलं
प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंधू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. किमान आधारभूत किमतीबाबत महेंद्रसिंह टिकैत यांचा फॉर्म्युला लागू केला जावा.असेही ते म्हणाले
१९६७ मध्ये गव्हाची किमान आधारभूत किंमत ७६ रुपये प्रति क्विंटल होती. तेव्हा प्रायमरी शाळेतील शिक्षकाची पगार महिना 70 रुपये होती. तेव्हा शिक्षक त्याच्या महिन्याच्या पगारात १ क्विंटल गहू खरेदी करु शकत नव्हता. आम्ही एक क्विंटल गहू विकून अडीच हजार वीट खरेदी करु शकत होतो”, असं टिकैत यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं. “तेव्हा सोन्याची किंमत २०० रुपये प्रति तोळा होती. त्यात ३ क्विंटल गहू विकून खरेदी केलं जाऊ शकत होतं. आता आम्हाला ३ क्विंटल गव्हाच्या बदल्यात १ तोळा सोनं द्या आणि त्याच हिशोबाने किंमत निश्चित करा. जेवढी किंमत अन्य वस्तूंची होईल, तेवढीच किंमत गव्हाची व्हायला हवी,” अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली.