३९ वर्षांत अनुभवलेला इतिहास बाहेर काढेन,

मुंबई: वृत्तसंस्था । ‘स्वत:ला वाघ म्हणवून घेता? कुणी सांगितलं तुम्ही वाघ आहात? मग पिंजऱ्यातले वाघ आहात की आणखी कुठले तेही सांगा,’ असं आव्हान नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांना दिलं. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशाराही राणेंनी दिला.

दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना बेडकाची उपमा दिली होती. उद्धव ठाकरे यांची ही टीका राणेंच्या जिव्हारी लागलेली दिसली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली. ‘तब्बल ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो. माननीय बाळासाहेबांनी मला अनेक पदं दिली. मंत्री केलं. मुख्यमंत्री केलं. बेडूक म्हणून हे सगळं मला दिलं नाही. वाघ म्हणून दिलं. उद्धव ठाकरेंना नाही दिलं. कारण, उद्धव ठाकरे हे बुळचट आणि शेळपट आहेत. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. बाळासाहेबांचं नाव घ्यायचीही त्यांची लायकी नाही. बाळासाहेबांना ह्यांनी छळलं होतं. त्यांच्या हयातीतच त्यांचे निर्णय फिरवले जात होते,’ असा आरोप राणेंनी केला.

‘हे स्वत:ला वाघ म्हणवून घेतात. कधी कोणाच्या कानफाटात मारलीय का? आमच्यासारख्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली. केसेस आम्ही घेतल्या,’ असं राणे म्हणाले. आडवे येणाऱ्यास आडवे करून पाडवा करू, अशी टीका उद्धव यांनी विरोधकांवर केली होती. त्यावर, ‘आडवे करण्याची भाषा करतात. एकटे नीलेश आणि नीतेश ह्यांना पुरून उरतील. एकटा नीतेश विधानसभेत ह्यांना भारी पडतो,’ असं राणे म्हणाले.

‘देशाच्या पंतप्रधानांबद्दल आणि त्यांच्या धोरणाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही. दिशाभूल करणारे, थापा मारणारे हे मुख्यमंत्री आहेत. काय बोलतात? कुठे कॉमा नाही, कुठे फुलस्टॉप नाही अशी ह्यांची अवस्था आहे. ह्या माणसाला फार अज्ञान आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गप्पा मारतात. आधी बेळगाव, कारवार मिळवून दाखवा, मग पाकव्याप्त काश्मीरवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारा,’ असं राणे यांनी सुनावलं.

Protected Content