२ हजारांची नोटही हद्दपार होणार?

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होतायत की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही.

 

डिसेंबर २०१६ मध्ये देशभरात नोटबंदी लागू झाली. जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यापाठोपाठ ५०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या आणि त्यासोबतच भारतीय बाजारपेठेतलं सर्वात मोठं चलन म्हणून २ हजार रुपयांची नोट बाजारात आली. मोठ्या नोटांची संख्या वाढल्यास त्यातून काळा बाजार वाढू शकतो, अशी देखील एक टीका नोटबंदीनंतरच्या निर्णयांवर केली जात होती.

 

 

 

 

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती सभागृहाला दिली. आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी २ हजारांची एकही नोट गेल्या २ वर्षांत छापली नसल्याचं म्हटलं आहे. “विशिष्ट किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सल्लामसलत करून घेत असते. यातून बाजारात नोटांच्या मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा ठेवता येतो. मात्र, २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये २ हजारांची एकही नोट छापली गेलेली नाही”, असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

 

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०१८रोजी देशात २ हजार रुपयांच्या ३३६ कोटी २० लाख नोटा होत्या २६ फेब्रुवारी २०२१मध्ये हाच आकडा २४९ कोटी ९० लाख नोटांपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारातून २ हजार रुपयांच्या नोटा कमी होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यापुढील काळात २ हजार रुपयांच्या नोटा छापल्या जाणार की नाही? याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही.

Protected Content