जालना: वृत्तसंस्था । २८ लाखांहून अधिक रोकड असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची घटना जालन्यातील औद्योगिक वसाहतीत शनिवारी मध्यरात्री घडली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.
या घटनेमुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेला लागूनच बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी सेंटरमधील एटीएम मशीनच पळवले. या मशीनमध्ये २८ लाख ६७ हजार ६०० रुपये होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये एटीएम टाकून नेताना दिसत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एटीएममधील रोकड आणि ४ लाख रुपये किंमतीचे मशीन असा ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून चंदनझिरा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस दलातही या घटनेने खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.