२५ वर्षानंतर सपा-बसपा एकत्र लढणार

लखनऊ वृत्तसंस्था । तब्बल पाव शतकानंतर समाजवादी पक्ष आणि बसपाने एकत्रीतपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून या महाआघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले असून शनिवारी लखनौत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. मात्र, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रसंगी अखिलेश यादव आणि मायावती यांनी काँग्रेस व भाजपावर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती ,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली. दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी केला. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देताना भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणार्‍या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Add Comment

Protected Content