हैदराबाद महापालिकेत भाजपला ४८ जागा !

 

मुंबई: वृत्तसंस्था । भाजपने जोरदार मुसंडी मारत हैदराबाद महापालिकेत तब्बल ४ जागांवरून थेट ४८ जागांपर्यंत झेप घेतली. भाजपच्या या हनुमान उडीमुळं आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा सुरू झाली आहे.

हैदराबाद महापालिकेची निवडणूक यावेळी प्रथमच देशपातळीवर चर्चिली गेली. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी लावलेली ताकद व केलेला तुफानी प्रचार या चर्चेचं कारण ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून देशातील अनेक बड्या नेत्यांनी हैदराबादच्या प्रचारात उतरले होते. भाजप हैदराबादची रणनीती मुंबईत चालणार का?, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

हैदराबाद महापालिका सध्या तेलंगण राष्ट्र समितीच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत टीआरएसनं तब्बल ९९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांच्या जागांमध्ये ४४ जागांची घट होऊन ५५ जागांवर समाधान मानावं लागलं. या सर्व जागा भाजपकडं गेल्याचं दिसत आहे. मागील वेळी अवघे चार नगरसेवक असलेल्या भाजपनं आता ४८ जागांपर्यंत मजल मारली आहे. भाजप हा महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ओवेसी यांचा एमआयएम पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपचं हे यश निश्चितच मोठं आहे.

हैदराबादची निवडणूक हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरच केंद्रीत राहील, असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेजस्वी सूर्या यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून हे अधोरेखित केलं गेलं. हैदराबादचं नामांतर ‘भाग्यनगर’ करण्याचं आश्वासन हा त्याचाच भाग होता. एमआयएमनंही भाजपला प्रत्युत्तर दिल्यामुळं निवडणुकीत हे दोन पक्ष प्रामुख्यानं चर्चेत राहिले. त्याचा फटका ‘टीआरएस’ला बसला.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका हे पुढचं लक्ष्य ठेवलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं आवश्यक आहे हे भाजप जाणून आहे. त्यामुळं मुंबईतही विशिष्ट रणनीती घेऊन उतरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. हैदराबादमध्ये चाललेला हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईत चालेल का, याबद्दल शंका आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप फारतर शिवसेनेवर टीका करू शकेल. मात्र, हा मुद्दा प्रमुख ठरण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. ‘एमआयएम’ फॅक्टर मुंबईत फारसा चालण्याची शक्यताही कमी आहे.

हैदराबादमध्ये टीआरएस, भाजप आणि एमआयएम या तीनच पक्षात निवडणूक झाली. काँग्रेस तिथं स्पर्धेत नव्हती. मुंबईत नेमकी कशी लढत होणार यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यातील सत्तासमीकरण बदललं आहे. मुंबईची निवडणूक आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार, अशी चर्चा आहे. तसं झाल्यास भाजपसाठी ते मोठं आव्हान असेल. मात्र, हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यास मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होईल. अशा परिस्थितीत संघटनात्मक बांधणी उत्तम असलेल्या पक्षांना अधिक फायदा होईल.

आघाडीतील पक्ष एकत्रितपणे न लढल्यास शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल. या लढतीत कुंपणावरील मतदार खेचण्यात कोण यशस्वी होतो, हे निर्णायक ठरेल. मुंबईमध्ये काँग्रेसची संघटना डळमळीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई काँग्रेससाठी अध्यक्षाचा शोध सुरू आहे. तसंच, काँग्रेसला अंतर्गत गटबाजीनं ग्रासलं आहे. काँग्रेसची ही स्थिती भाजपसाठी लाभदायक ठरू शकते. मागील निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर भारतीय मतदार भाजपनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं खेचला होता. यावेळी काँग्रेस तो रोखण्यात कितपत यशस्वी होते यावर बरंच काही ठरणार आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. इथे राष्ट्रवादी नेहमी दुय्यम भूमिकेत असते. मुंबईत पक्षाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. काँग्रेस व शिवसेनेसोबत लढल्यास राष्ट्रवादीला त्याचा फायदा मिळू शकतो. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेत आघाडी व्हावी यासाठी शरद पवार प्रयत्न करतील, अशी दाट शक्यता आहे.

काँग्रेस सोबत न आल्यास किमान शिवसेनेला सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. त्याचा फायदा काही प्रमाणात शिवसेनेला होऊ शकतो. शिवाय, भाजपच्या केंद्रीय पातळीवर नेत्यांचा प्रचारातील हवा काढून घेण्याची ताकद शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आहे. त्यांच्या एकत्रित सभा देखील वातावरण फिरवू शकतात.

महाआघाडीतील तीन पक्ष आणि भाजप व्यतिरिक्त मनसे हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. मनसेला आपल्या बाजूनं घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या दृष्टीनं भाजपच्या नेत्यांकडून सूचक वक्तव्यही केली जात आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी अद्याप कुठलंही भाष्य केलेलं नाही. राज ठाकरे यांची सध्याची वाटचाल पाहता ते स्वबळावर निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. मनसेचा बहुतांश मतदार मराठी आहे. मनसे फॅक्टर चालल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळं मनसे चालावी असा भाजपचा प्रयत्न असेल. त्यासाठी मराठी अस्मितेचा मुद्दा जाणीवपूर्वक प्रचारात आणला जाण्याचीही शक्यता आहे.

Protected Content