….हे सर्व मोदींनाच शोभते ! : शिवसेनेची टीका

मुंबई प्रतिनिधी । मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा झालं असतं, अशी टीका करत आज पंतप्रधानांच्या व्हॅटीकन भेटीवरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातून आज पंतप्रधान मोदी यांच्या व्हॅटीकन दौर्‍यावर भाष्य करण्यात आलेले आहे. यात म्हटले आहे की, युरोप दौर्‍यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? मोदी यांनी पोप यांना हिंदुस्थानात यायचे खास आमंत्रणही दिले. मोदी हे इटलीत गेले आणि अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते आणि नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते.

यात पुढे म्हटले आहे की, कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वत:ची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करत असतात. मोदी हे पोप यांना भेटले. त्यांनी या सर्वोच्च ख्रिश्‍चन धर्मगुरुंचे आशीर्वाद घेतले. पोपसाहेबांचे स्थान जगात मोठे आहे. त्यांच्या शब्दाला आणि अस्तित्वाला मान आहे. पोप यांना भेटणे यात एक आनंदच असतो. व्हॅटिकनच्या माध्यमातून जगभरात ख्रिस्ती मिशनऱयांचे सामाजिक कार्य सुरूच असते. व्हॅटिकनची आर्थिक ताकद मोठी आहे. व्हॅटिकनची आर्थिक उलाढाल चार अब्ज युरो इतकी आहे. व्हॅटिकनची स्वत:ची बँक आहे. त्या बँकेची उलाढाल आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पन्नासपट आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत धर्म म्हणून ख्रिश्‍चन धर्माचाच उल्लेख करावा लागेल. जगातील ५५ टक्के संपत्तीचे मालक ख्रिश्‍चन धर्मीय आहेत. त्याखालोखाल ५.८ टक्के मुस्लिम, हिंदू ३.४ टक्के, ज्यू १.२ टक्के असा क्रम लागतो. म्हणजे जगातील श्रीमंत धर्मगुरुंना भेटायला आपले पंतप्रधान गेले. मौदी आणि पोप यांच्यात म्हणे जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली.

यात पुढे नमूद केले आहे की, मोदी-पोप भेटीने गरिबी निर्मूलन होईलच आणि हवामान बदलाच्या समस्येवरही मार्ग निघेल. पोपसाहेबांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले आणि ते दिल्लीत येतील. १९९९ साली तेव्हाचे पोप दिल्लीत अवतरले होते. तेव्हाच्या पोप यांना सोनिया गांधी भेटल्या म्हणून तत्कालीन भाजपने भलतेच काहूर माजवले होते. पण पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे.

मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी व्हॅटिकनमधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तौबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच मन की बातमधून सांगावे लागेल! असा टोला यात मारण्यात आला आहे.

Protected Content