नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने स्पष्ट केले आहे की, हॅकर्सने खात्यामधील पैसे लंपास केल्यास किंवा खात्यासंबंधित ऑनलाईन गैरव्यवहार केला तर त्यास पूर्णपणे बँक जबाबदार राहील.
त्यासाठी ग्राहकाची फसवणूक झाली आहे, किंवा ग्राहकाचा काहीही संबंध नाही , हे सिद्ध झाले पाहिजे . मात्र ग्राहकाच्या चुकीमुळे त्याचं नुकसान झालं तर त्यास बँकेला जबाबदार धरता येणार नाही. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे पीठासीन सभासद सी. विश्वनाथ यांनी हा निर्णय दिला आहे. ते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हॅक होण्याची किंवा अनधिकृत मार्गाने बनावट क्रेडिट कार्ड बनवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राहकासोबत कोणताही गैरव्यवहार झाला, त्याच्या खात्यामधील पैसे चोरीला गेले, हॅकर्सनी पैसे लुबाडले अथवा कोणताही ऑनलाईन फ्रॉड झाला तर त्याला ग्राहक नव्हे त बँक जबाबदार असेल. एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड हरवलं आणि त्याच्या खात्यामधून आर्थिक व्यवहार होऊन त्याचं नुकसान झालं तर त्यालादेखील बँकच जबाबदार असेल. कारण जर असं होत असेल तर याचा अर्थ त्या बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत काहीतरी दोष असेल.
ग्राहक आयोगाने एका खासगी बँकेला अशाच प्रकारच्या फसवणुकीत ग्राहकाला भरपाई देण्यास सांगितले आहे. हँकर्सने ग्राहकांचे पैसे लुबाडले तर ते पैसे आणि ग्राहकाचा मानसिक छळ झाला त्याबद्दल खासगी बँकेला त्या ग्राहकाला नुकसानभरपाई देण्यास सांगितले आहे.
सी विश्वनाथ यांनी या प्रकरणात बँकेला जबाबदार ठरवलं आहे. एका एनआरआय महिलेचं क्रेडिड कार्ड हॅक करुन तिचे पैसे लुबाडण्यात आले होते. तिने एनसीडीआरसीकडे तक्रार केली. एनसीडीआरसीने बँकेला जबादार ठरवले. बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि आदेश दिले की, बँकेने पीडित महिलेला ४. ४६ लाख रुपये परत करावे लागतील, तिला १२ टक्के व्याजही द्यावं लागेल.
तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, ज्यावेळी तिचं क्रेडिट कार्ड हॅक झालं, तेव्हा ते कार्ड तिच्याच जवळ होतं. तसेच ज्या ठिकाणाहून तिच्यासोबत फ्रॉड झाला ते ठिकाण तिच्या घरापासून बऱ्याच मैलांच्या अतंरावर आहे. म्हणून एनसीडीआरसीने फैसला सुनावताना म्हटले आहे की, बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टिममध्ये काही दोष असतील, ते त्यांनी दुरुस्त करावेत.