मुंबई प्रतिनिधी । माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य ही त्यांची बौध्दीक दिवाळखोरी असल्याची टीका महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटकी होता, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हेगडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत भाजपावर टीक केली आहे. अनंतकुमार हेगडे यांचे वक्तव्य निंदनीय असून यावरून भाजपा नेतृत्वातील बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. याचबरोबर, ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणार्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो. यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हातमिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हाच खरा भाजपाचा चेहरा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगत भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.