हिंसक कंटेंट शेअर करणाऱ्या 70 हजार अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई

 

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । ट्रम्प समर्थकशी संबंधित ७० हजारांहून अधिक हँडेल्स ट्विटरने निलंबित केले आहेत. गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करत हिंसाचार घडवून आणला होता. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हे कठोर पाऊल उचललं आहे.

सोशल मीडियावरील हिंसक तसेच चिथावणीखोर पोस्ट्स रोखण्यासाठी ट्विटर आता कडक कारवाई करत आहे. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार झाला होता, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले होते. आता ट्विटरने द्वेषयुक्त आणि हिंसक कॉन्टेंटवर बंदी घालण्यासाठी अधिक कठोर पाऊल उचलले आहे.

ट्विटरने म्हटले आहे की, अमेरिकेची वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि शहरासह इतर ठिकाणी नुकसान वाढू नये, तसेच पुन्हा हिंसाचार घडून नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आक्षेपार्ह कन्टेंट शेअर करणारे हजारे ट्विटर अकाऊंट्स बंद केले आहे. काही वेळा अशी प्रकरणे समोर आली आहेत की, एकच व्यक्ती अनेक अकाऊंट वापरत होती, आणि त्या अकाऊंटद्वारे तो हिंसक आणि चिथावणीखोर ट्विट्स करत होता. त्यामुळे त्यांचे ट्विटवर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स खबरदारी घेताना दिसत आहेत. फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामनेही डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले आहे. ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांविरोधातही सोशल मीडिया कंपन्या कठोर पाऊल उचलत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल त्यांना अमान्य आहे. तेव्हापासून ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेवर केलेल्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थाबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली होती. वॉशिंग्टनमधील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे १५ दिवसांसाठी आणीबाणी लावण्यात आली आहे.

Protected Content