मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काश्मिर खोर्यातून हिंदूंचे स्थलांतर सुरू झाले असतांना मनसेने आता हिंदू समुदायांसाठी बंदुकांचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या टार्गेट किलींगमुळे दहशत पसरली आहे. एका महिन्यातच ४० नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे आता या भागातून अनेक नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेवरून चिंता व्यक्त करण्यात येत असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत या हत्यांचा निषेध केला आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसंच बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण केंद्र सरकारनं दिलं पाहिजे.
तर दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात ४० नागरिकांची हत्या केली आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचार्याचीही हत्या केली. यामुळे तेथून हिंदू नागरिक जम्मूकडे निघाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्लीत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत काश्मीर खोर्यातल्या सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.