यावल (प्रतिनिधी) दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे व अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी जोरदार टीका करत …हा तर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, असल्याचे म्हटले आहे.
अतुल पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावल येथील भुसावळ टी पॉईंटवर दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे व अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. वास्तविक बघता हे आंदोलन सुरू असताना तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी स्वतःहून आंदोलनाला सामोरे जात निवेदन स्वीकारले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्स पाळून व तोंडाला मास बांधून शांततामयरित्या रास्ता रोको आंदोलन केले होते. असे असताना मात्र रात्री उशिराने पोलीस प्रशासनाने कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत आमच्यावर गुन्हे दाखल केले. यापूर्वी असेच आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांनी देखील गेल्याच आठवड्यात केले होते. मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या आघाडी सरकार विरोधात केले असल्याने शासनाने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी गुन्हे दाखल केले आहेत. शासनाकडून भाजपचा बुलंद आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. असे असले तरी जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी बांधील असून असे कितीही गुन्हे दाखल झाले, तरी महाराष्ट्र सरकारची मनमानी सहन करणार नाही. आंदोलक विरोधी पक्ष भाजपला वेगळा न्याय व सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला वेगळा न्याय, ही प्रशासनाची भूमिका यातून स्पष्ट होत आहे, असेही अतुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे