जळगाव-लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हरी विठ्ठल नगर व परिसरात आयुक्त विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गटार व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान, एका दुकानदार महिलेने या कारवाईस विरोध केल्याने काही काळ गोंधळ उडला होता.
हरी विठ्ठल नगर व परिसरात नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रस्तावित असलेल्या गटरीचे लाईन आउट अतिक्रमण असल्याने देण्यास अडचण येत होती. त्यामुळे या नागरिकांना दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या वतीने गटारींचे मार्किंग करून अतिक्रमण काढण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आली होती. मात्र, नागरिकांनी स्वतः हून अतिक्रमण न काढल्याने आज गुरुवार दि. १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० पर्यंत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास २० अतिक्रमण काढण्यात आली. ही कारवाई करत असताना भिल वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका किरणा दुकानदार महिलेने आम्हाला अतिक्रमण काढण्याची नोटीस दिलेली नसल्याची तक्रार करत अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी महिला पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर कारवाई पुन्हा सुरळीत सुरु झाली. आज करण्यात आलेल्या कारवाईत अतिक्रमित सेप्टिक टँक, वाॅल कंपाऊंड, पक्के किराणा दुकान, पत्री शेड काढण्यात आले. महानगर पालीकेच्या वतीने हरी विठ्ठल नगर व परिसरात नगरोत्थान अभियानअंतर्गत गटर बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार आहे. काही नागरिकांनी रस्ते व गटारीवर अतिक्रमण केल्याने प्रस्तावित विकास कामे करण्यास बाधा उत्पन्न होत होती. असे अतिक्रमण आज काढण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिली. ही कारवाई नगररचना विभागाचे रचना सहाय्यक अतुल पाटील, बांधकाम विभागाचे मनोज वडनेरे, चित्र शाखेचे हेमंत विसपुते, सुभाष मराठे, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक इस्माईल शेख, संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, सतीश ठाकरे, दिलीप भालेराव, शेखर ठाकूर यांच्या पथकाने केली. यावेळी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/981376085880528