नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हप्तेस्थगितीच्या व्याजावरील व्याजमाफीची रक्कम खात्यात आजपासून जमा होणार आहे. सरकारच्या तिजोरीवर सुमारे ६००० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील तफावत असलेली रक्कम कर्जदारांच्या खात्यात जमा होणार आहे.
व्याजमाफीची रक्कम कर्जदारांच्या खात्यात जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे आजच बँकांना कर्जदारांना कॅशबॅक द्यावी लागणार आहे. कर्जदारांना दोन दिवसांपासून बँकांकडून अशा प्रकारचे मेसेज येत आहेत. काही रक्कम खात्यात जमा केली जात आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या योजनेबाबत संभ्रम दूर करण्यासाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध केली होती. व्याजावरील व्याजमाफी देण्यासाठी २९ फेब्रुवारी ही तारीख ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चक्रवाढ व्याज माफीने जवळपास ७५ टक्के कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
व्याजमाफी योजनेचा लाभ एमएसएमई कर्जे, शिक्षणकर्जे, गृहकर्जे, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतलेली कर्जे, क्रेडिट कार्डाची थकित रक्कम, वाहनकर्जे, व्यावसायिकांनी घेतलेली वैयक्तिक कर्जे व वापरासाठी घेतलेली कर्जे यांना मिळणार आहे. या सर्व प्रकारच्या दोन कोटी रुपयांपर्यंत कर्जे घेणाऱ्या ऋणकोंना याचा लाभ मिळणार आहे. मात्र संबंधित खाते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत त्या वित्तसंस्थेने स्टॅण्डर्ड खाते या गटात टाकलेले असावे, असेही िरझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. भारतीय स्टेट बँकेची या संपूर्ण योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.