जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन असतांना शहरातील हनुमान नगर येथे बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातील १७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी अर्जून पोपटराव आहेर (वय-३५) रा. हनुमान नगर, (मु.रा.पिंपळगाव, जि.नाशिक) हा भाडेकरू म्हणून राहतो. तो कालिंकामाता मंदीरासमोर डी.एस.साळुंखे यांच्या देशी दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करतो. लॉकडाऊन काळात त्याने दुकानातून सुमारे १७ हजार ४७२ रूपये किंमतीचे टँगो पंच देशी दारू विकत घेतली. बेकायदेशीर व विनापरवाना देशी दारूची विक्री लॉकडाऊनच्या काळात होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी करवाई करत त्यांच्या ताब्यातील टँगो पंचचे सहा बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत केला. निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर मद्य विक्री व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.कॉ. असीम तडवी, सचिन पाटील, निलेश पाटील यांनी करवाई केली. पुढील तपास स.फौ. आनंदसिंग पाटील करीत आहे.