जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 15.01 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चार गेट अर्धा मीटरने उघडले असून धरणातून आज 3 हजार 390 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 424.96 दलघमी म्हणजेच 15.01 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 7.00 टीएमसी, तर वाघूर धरणात 6.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी 6 जुलैपर्यंत 154 मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी आजपर्यंत 204 मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गेल्या चोवीस तासात हतनूर धरण क्षेत्रात 2 मिमी, वाघूर धरण क्षेत्रात 14 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 106.38 दलघमी म्हणजेच 3.76 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 38.55 दलघमी म्हणजेच 1.36 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा 65.35%, मंगरुळ 78.43%, सुकी 69.49%, मोर 62.25%, हिवरा 99.54%, तोंडापूर 58.92, गुळ 57.23%, भोकरबारी 72.74%, बोरी 72.74% या नऊ प्रकल्पांमध्ये पहिल्या महिन्यातच 50 % पेक्षा अधिक उपयुक्त साठा झाला आहे. तसेच बोरी धरणाचे 2 गेट 0.15 मीटरने उघडण्यात आले आहे.