स्वस्त धान्य दुकानात धान्य कमी ; जि. प.सदस्या सावकारे यांची चौकशीची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनामुळे हल्ली सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वच रोजगार ठप्प झालेला आहे. उत्पन्नाचे सारेच मार्ग बंद झालेले असल्याने त्यातचं स्वस्त धान्य दुकानांत वाटप करण्यासाठी गोडाऊनमधून आलेल्या कट्ट्यामध्ये दिड ते दोन किलो धान्य कमी असल्याची तक्रार जि. प. सदस्य पल्लवीताई सावकारे यांनी स्वतः पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली.

कोरोनाच्या संकटकाळात श्रमजिवी, कष्टकरी शेतकरी यांना त्यांचे हक्काचे रेशन पूर्णपणे मिळण्यासाठी जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी आज स्वतः भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावातील स्वस्त धान्य दुकानावर धान्य वाटप करण्यासाठी उपस्थित राहून गोडाऊनमधून आलेला माल वजन करून घेतला असता प्रत्येक कट्टयामध्ये दीड ते दोन किलो धान्य कमी आढळून आले. यात क्विंटल मागे तीन ते चार किलो धान्यावर डल्ला मारला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी रेशन दुकानदाराकडे विचारणा केली असता,दुकानदाराने सांगितले कि आम्हाला हा माल गोडवूनवरूनच कमी मिळत आहे. याबाबत सावकारे यांनी गोडाऊन किपरला विचारले असता गोडाऊनकिपर व अधिकारी सांगत आहेत की शासनानेच आम्हाला असे आदेश दिले आहेत. शासन अशा प्रकारे आदेश कसे देऊ शकते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर स्वस्त धान्य दुकानदाराकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे क्विंटल मागे ३ ते ४ किलो तांदूळ कमी आले आहे. जर भुसावळ तालुक्यात सुमारे ७ ते ८ हजार क्विंटल तांदूळ शासनाकडून प्राप्त झालेला आहे, जर क्विंटल मागे ३ किलो तांदूळ कमी आला असेल तर सुमारे २४० क्विंटल तांदूळ कुठे गेला आणि गहू, डाळ अशा इतर धान्यामध्ये किती मोठा घोटाळा झाला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. आज पर्यंत फक्त थातुर मातुर कारवाई झालेली असून कोणालाही निलंबीत करण्यात आलेले नाही.

Protected Content