नवी दिल्ली : वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी डॉ. अनिल काकोडकर यांचे वैचारिक मतभेद असल्याने त्यांची नियुक्ती रद्द झाली. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना आयआयटी रूरकीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची नियुक्ती केुली होती
केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने रूरकी येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती प्रवब मुखर्जी यांनी केलेली नियुक्ती परस्पर रद्द केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर मोदी सरकारने या पदावर राष्ट्रपतींनी जारी केलेला आधीचा आदेश रद्द न करता नवीन नियुक्ती केली.
शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माजी राष्ट्रपतींनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष काकडोकर यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी अर्ज न करता थेट नवीन प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर करत तो मान्य करुन घेतला. त्यामुळेच काकोडकर यांच्या जागी बी. व्ही. आर. मोहन रेड्डी यांची आयआयटी रूरकीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. रेड्डी हे आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष असून त्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
के. आर. नारायणन यांच्यावेळी राष्ट्रपती भवनामध्ये काम केलेल्या माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आधीच्या नियुक्तीचा प्रस्ताव मागे घेतल्याशिवाय नवीन प्रस्ताव आणणे योग्य नाहीय. प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली होती तर त्याला लागू करायला हवं होतं.” आधीची नियुक्ती रद्द करण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये कोणताही अर्ज पाठवण्यात आलेला नव्हता असं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
“आधीचा प्रस्ताव मागे घेण्यात आला नसेल तर त्याचा अर्थ ती नियुक्ती अद्यापही लागू होते. असं असतानाच मंत्रालयाने नवीन प्रस्ताव कसा सादर केला. कायद्याच्या दृष्टीने हा चुकीचा निर्णय आहे,” असं राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्याने सांगितले. प्रकाश जावडेकर यांनी काकोडकरांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर केला होता. आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र २०१५ साली काकोडकर आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरुन मतभेद झाले आणि त्यानंतर काकोडकर यांनी आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
स्मृती इराणी यांनी काकोडकरांनी स्वत:च्या मर्जीतील व्यक्तींना निर्देशक पद देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. मात्र काकोडकर यांनी हे आरोप
फेटाळून लावले होते. काकोडकर यांनी आयआयटी पाटणा, भुवनेश्वर आणि रोपडमधील नियुक्त्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. २०१८ साली राष्ट्रपती कार्यालायाने मंत्रालयाकडे काकोडकर यांच्या नियुक्तीबद्दल विचारले होते. यापूर्वी राष्ट्रपती भवनने विश्व भारतीच्या कुलपतींच्या नियुक्तीचा प्रस्ताव मागे घेतला होता. मात्र काकोडकरांच्या संदर्भात राष्ट्रपती भवनाकडून प्रस्ताव मागे घेण्यात आला नाही.