जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील तरूणीचा व्हिडीओचा गैरवापर करत अश्लिल शब्द लिहून इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तरूणीच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल व्हिडीओ आणि फोटो पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ मे रोजी रात्री ८ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २८ वर्षीय तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. १७ मे रोजी अज्ञात व्यक्तीने या तरूणीचा व्हिडीओचा गैरवापर करून बनावट साईटवर खाते तयार केले. आणि तरूणीचे खाते असल्याचे भासवून बनावट खात्यावरून तरूणीच्या इन्स्टाग्राम खात्यावर महिला व पुरूषांचे अश्लिल व्हिडीओ पाठवून बदनामी केली. दरम्यान, हा प्रकार तरूणीच्या लक्षात आल्यानंतर गुरूवारी १८ मे रोजी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात खातेधारकावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे करीत आहे.