जळगाव, प्रतिनिधी । येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र २७७/२ च्या ओपन स्पेस (खुली जागा) जागेवर महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर केला आहे. यास परिसरातील स्थानिक रहिवाशांनी विरोध करत प्रास्ताविक रुग्णालय इतर ठिकाणी बांधण्यात यावे अशी मागणी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्याकडे केली आहे.
पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र २७७ /२ च्या ओपन स्पेस (खुली जागा) ही जागा स्थानिक राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम करणे, वयोवृद्ध यांच्यासाठी व बालकांना खेळण्यासाठी तसेच महिलांना विविध कार्यक्रम करण्यासाठी ही जागा सोडलेली असते. मात्र, सोनी नगरात रुग्णालय बांधण्यावर भर देण्यात येत आहे. पिंप्राळा परिसरातील वैकुंठधाम समोरील संत मीराबाई नगर परिसरातील डीपी प्लाननुसार आरक्षित जागा आहे. तसेच तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी असताना सर्व नगरसेवकानी मिळून पिंप्राळा परिसरातील सोमाणी संकुलच्या वरील जागेवर दवाखाना बांधण्यात यावा असा प्रस्ताव मंजूर केला आहे. पिंप्राळा हुडको परिसरातील ३ एकर जागा मनपाची जागा पडून आहे. या जागेवर रुग्णालय न बांधता महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. याप्रकरणी परीसरातील नागरिकांची हरकत असून याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, भाजपाचे नगरसेवकांना निवेदन दिले आहे. दरम्यान या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. तरी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दखल घेत रुग्णालय इतरत्र भागात बांधावे, सोनी नगरच्या मोकळ्या जागेत बांधू नये अशी मागणी ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे, निलेश जोशी, जी. एस.शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दिपक पाटील ,अजय पाटील यांनी केली आहे.