मुंबई-।देशात सध्या कोवीड महामारीची परिस्थीती आहे तसेच जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांनी ९ डिसेंबर रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पहाता सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस उत्सवीपद्धतीने साजरा करु नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यासंदर्भात थोरात म्हणाले की, देशातील अन्नदाता सध्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे ही आजची गरज आहे. पक्षाध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस दरवर्षी काँग्रेस कार्यकर्ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करतात, पोस्टर्स, बॅनर लावतात परंतु यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. या परिस्थितीचे भान ठेवून ९ डिसेंबरचा सोनियाजी गांधींचा वाढदिवस साजरा करु नये मात्र महाराष्ट्रातील रक्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच केलेल्या आवाहनानुसार ‘जीवनदान महाभियान रक्तदान’ शिबीर मात्र मोठ्या प्रमाणात आयोजित करावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबीरात सभागी व्हावे. राज्याला रक्ताची नितांत गरज असून सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करावे, असे थोरात म्हणाले.