सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार साधना उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू.जे. महाविद्यालय जळगाव च्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी द्वारे सामूहिक सूर्यनमस्कार साधना कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २८ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ओरीयन सीबीएसई इंग्लिश मेडियम स्कूल च्या प्राचार्या सुषमा कंची, क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक व योगसाधक डॉ. डी. टी. नेहते, सोहम चे संचालक डॉ. देवानंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात शंखनाद, ओंकार प्रतिमेचे पूजन आणि प्रार्थनेने करण्यात आली. सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सूर्यनमस्कार दिनाचे महत्व याविषयी माहिती दिली. उपस्थित योग साधक आणि विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्काराचा सामूहिक अभ्यास प्रा. गीतांजली भंगाळे यांनी करून घेतला. यावेळी साधना बोंडे यांनी अग्निहोत्र सुद्धा केले. प्राचार्या सुषमा कंची यांनी सूर्यनमस्कार दिनानिमित्त मार्गदर्शन करीत शरीरशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून सूर्यनमस्काराचे आणि सूर्य उपासनेचे महत्व पटवून दिले.

योग साधना करताना योगासनांच्या पूर्वी शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक असते. सातत्याने सूर्यनमस्कार साधना केल्याने शारीरिक लाभ तर प्राप्त होतातच शिवाय मंत्र उच्चारासहित सूर्यनमस्कार केल्याने मानसिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याचप्रमाणे सूर्यनमस्काराचा स्थिरतापूर्वक अभ्यास केल्यास अनेक शारीरिक, मानसिक विकार दूर होऊन सकारात्मक उर्जा प्राप्त होते व आध्यात्मिक ऊर्जा वाढीस लागते, असे विचार मान्यवरांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी तर आभार प्रा. सोनल महाजन यांनी व्यक्त केले. शांतीपाठ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता विश्वशांती प्रार्थना करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. गीतांजली भंगाळे प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, साहिल तडवी, पूजा उभाळे, सायली अजनाडकर, विवेक चौधरी यांनी परिश्रम घेतले. ओरीयन सी.बी.एस.ई. स्कूल चे विद्यार्थी, शिक्षक तसेच बी.ए., एम.ए. योगिक सायन्स, योगशिक्षक पदविका, निसर्गोपचार पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तसेच योग- निसर्गोपचार प्रेमी साधकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून सूर्यनमस्कार साधनेचा लाभ घेतला.

Protected Content