सुषमा अंधारेंवर हात उगारणार्‍या पदाधिकार्‍याची पक्षातून हकालपट्टी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हात उगारणारे बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

काल बीड जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आल्याचे दिसून आले.  बीडमध्ये २० मे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुषमा अंधारे गुरुवारी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या सगळ्या धुमश्चक्रीत वरेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या गाडीची काच फोडली होती.

 

दरम्यान याप्रसंगी झालेल्या वादात जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी उपनेत्या सुषमा अंधारे   यांच्यावर हात उगारल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आपणच त्यांना चापट्या लगावल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. हा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता.  मात्र याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली. त्यानंतर अप्पासाहेब जाधवांवर ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे मागत असल्यामुळेच अंधारे यांना दोन चापट्या लगावल्यात, असा दावा बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी केला होता. तर कोणतीही मारहाण झाली नाही, असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला  होता.

Protected Content