सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या अफवेने गोंधळ; शशी थरुर यांची क्षमायाचना

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसचे शशी थरुर यांच्या  ट्विटमुळे गोंधळ उडला.त्यांनी  लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट केलं मात्र भाजपा  नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करुन सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं म्हटलं. नंतर थरुर यांनी माफी मागत ट्विट डिलीट केलं.

 

मात्र थरुर यांच्या या ट्विटमुळे प्रसारमाध्यमांपासून अनेक व्हेरिफाइड अकाऊंट असणाऱ्या नेत्यांनी सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूसंदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे ट्विट केलं. यामुळेच सुमित्रा महाजन यांच्या संदर्भातील हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होता.

 

थरुर यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सुमित्रा महाजन यांचा फोटो ट्विट करत त्यांचं निधन झाल्याचं ट्विटरवर म्हटलं. थरुर यांनी महाजन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

 

 

मात्र त्यानंतर ११ वाजून ३३ मिनिटांनी कैलास विजयवर्गीय यांनी थरुर यांचं ट्विट कोट करुन रिट्विट करत, “ताई एकदम ठणठणीत आहेत, देव त्यांना दिर्घायुष्य देवो,” असं ट्विट केलं.

 

या ट्विटवर थरुर यांनी रिप्लाय केला. “धन्यवाद कैलास विजयवर्गीय. मी माझं ट्विट दिलं आहे. लोकं अशा बातम्या कोणत्या वाईट विचारसणीने पसरवतात कळत नाही. मी सुमित्राजींच्या आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो,” असं थरुर म्हणाले.

 

 

नंतर परत एक ट्विट करताना थरुर यांनी, “सुमित्र महाजन यांची प्रकृती उत्तम आहे ऐकून समाधान वाटलं. मला एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाली होती जी मला खरी वाटली. चूक सुधारली आणि आणि यावरुन बातमी करणाऱ्यांनाही ती सुधावारी असं आवाहन करतो,” असं म्हटलं होतं.

 

सुमित्रा महाजन या इंदूर लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी १९८९ पासून सलग ८ वेळा इंदूरमधून निवडणृक लढवलीय. १९८४-८५ या काळात त्यांना इंदूरच्या उपमहापौरपदी नियुक्त करण्यात आलं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला पत्र लिहीत निवडणूक लढवायची नसल्याचं सांगत सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचं जाहीर केलं होतं. सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणचा आहे. त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झालं. इंदूरचे अधिवक्त जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या आहेत.

Protected Content