सुप्रीम कॉलनीतील अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करा ; महापौरांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे आणि उर्वरीत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून नागरिकांची पाण्यासाठी वणवण होणार नाही, अशा सूचना महापौर भारतीताई सोनवणे यांनी दिल्या आहेत.

 

सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाची शुक्रवारी महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, उपगटनेते राजेंद्र पाटील, गणेश सोनवणे, अमित काळे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, मनपा पाणीपुरवठा अभियंता सुनील खडके, मक्तेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

सुप्रीम कॉलनीतील नागरिकांचे पाण्यासाठी नेहमी हाल होत असतात. अमृत योजने अंतर्गत त्या परिसरासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्या कामाची पाहणी केली असता त्या कामाला बराच उशीर झाला असल्याचे लक्षात आले. महापौरांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधीला चांगलेच सुनावत काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांना काम करताना येत असलेल्या त्रुटी दूर करून काम पूर्ण होताच पाईपलाईन टाकणे आणि उपसा पंप बसविण्याचे काम सोपविलेल्या मक्तेदाराशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या.

 

उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने दुरुस्ती करा


जळगाव शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे सर्व जुने पंप काढून नवीन पंप बसविण्याचे काम एका मक्तेदाराला देण्यात आले आहे. त्याचा आढावा दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा दालनात घेतला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, अमित काळे, विठ्ठल पाटील, मनपा अभियंता सुनील खडके, योगेश बोरोले, मक्तेदाराचे प्रतिनिधी श्री.बऱ्हाटे, सुनील पाटील यांची उपस्थित होते. उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने ती तातडीने करण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधीला दिल्या आहे. तसेच तोवर सुप्रीम कॉलनीच्या केंद्राचे काम सुरू राहणार असल्याने तिथले पंप तयार करण्यासाठी ऑर्डर करून ठेवण्याचेही महापौरांनी सुचविले.

Protected Content