जळगाव, प्रतिनिधी । शहरातील महत्वाचा परिसर असलेल्या सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत असून पंप हाऊसचे काम अंतीम टप्प्यात आहे. शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली असता दीड महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे.
अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची आणि पंप हाऊसच्या कामाचा महापौर गेल्या अनेक महिन्यांपासून आढावा घेत आहे. शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता पंप हाऊसचा स्लॅब उघडण्यास ८ दिवसांचा कालावधी असून टाकीला तसेच पंप हाऊसचे आतून-बाहेरून प्लॅस्टर करण्यास किमान महिनाभर वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंप हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी विद्युत मोटार बसविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागतील अशी माहिती मक्तेदाराने दिली.
दीड महिन्यात होणार काम पूर्ण
बांधकामाला १ महिना आणि विद्युत मोटार बसविण्यास १५ दिवस असा दीड महिन्याचा कालावधी संपूर्ण कामाला लागणार आहे. परिसरात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली असून त्याद्वारे नागरिकांना पुढील महिन्यात पाणी देणे शक्य होणार आहे.
परिसरात रिक्षाद्वारे जनजागृती करा
सुप्रीम कॉलनीत सर्वांना अमृत योजनेच्या पाईपलाईनवरून नवीन नळ संयोजन देण्यात येत आहे. नागरिकांना नवीन नळ संयोजन घेण्याबाबत जागरूक करण्यासाठी ध्वनीफीत तयार करून ती घंटागाडी आणि रिक्षावर लावावी परिसरात फिरवण्यात यावी, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.
नवीन कनेक्शन घेण्याचे आवाहन
सुप्रीम कॉलनी परिसरात अनेक घरांना पिण्याच्या पाण्याचे संयोजन नसून काही ठिकाणी अवैध नळ संयोजन आहेत. नवीन टाकीवरून अमृत योजनेची जोडणी करण्यात आली असून त्याद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घ्यावे आणि भविष्यातील त्रास टाळावा असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.