मुंबई प्रतिनिधी । सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
विद्या चव्हाण यांच्या सुनेने १६ जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दिली होती. यानुसार त्यांच्या सासू तथा विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. विद्या चव्हाण आणि इतर सदस्यांविरोधात कलम ४९८ ए, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तथापि, त्यांनी याबाबत स्वत: कोणतीही माहिती दिलेली नाही.