जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय कंपनी सचिव संस्थानतर्फे घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल लेव्हल (सी.एस.) परीक्षेत वीणा सुहास नारखेडे यांनी यश संपादन केले आहे.
वीणा यांनी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स कोरोनाच्या विपरित काळात स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केला, हे विशेष ! तत्पूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेतही वीणा यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. वीणा या दहावी (96 टक्के) आणि बारावी बोर्ड परीक्षेत देखील गुणवत्ता यादीत चमकल्या होत्या. बारावीत वाणिज्य विभागातून त्या संपूर्ण बोर्डात प्रथम आल्या होत्या. आरआर विद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीच बहुमानही त्यांनी मिळविला आहे.
वाणिज्य शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार्या वीणा यांना अभ्यासाव्यतिरिक्त संगीत, लेखन, वाचन आणि अभिनयाची आवड आहे. त्या लेखिका आणि कवयित्रीदेखील आहेत. त्या लेवागणबोली साहित्य मंडळाच्या संस्थापक सदस्या देखील आहेत. अखिल भारतीय लेवा गणबोली साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांची मोलाची भूमिका असते. सन 2015-16 मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सीआर म्हणून त्या निवडूनही आल्या होत्या. वीणा या साहित्यिक डॉ. अरविंद आणि सुमन नारखेडे यांची नात तसेच सुहास आणि प्रिया नारखेडे यांच्या कन्या आहेत. सीएस परीक्षेसाठीच्या स्वयंअध्ययनात त्यांना सीए पदम पाटील आणि सीए करण काबरा यांचे मार्गर्शन लाभले.
अंबानी फेलोशिपच्या मानकरी
वीणा नारखेडे या, रिलायन्स उद्योग समूह संचलित रिलायन्स फाऊंडेशनकडून दिल्या जाणार्या मानाच्या धीरूभाई अंबानी शिष्यवृत्तीच्या देखील मानकरी आहेत.